जीवना रे, का फिरूनी..

जीवना रे का फिरूनी, द्यायचे कोडे असे ?
गुंतणे गुंत्यात फिरुनी, द्यायचे कोडे असे?

टाळता मी जे नकोसे, का समोरी तेच ये,
कावळा होई पराचा, घ्यायचे कोडे असे ।

वस्त्र हे काषाय माझे, मीच स्वेच्छे नेसले,
आज ते भासे गुलाबी, ल्यायचे कोडे असे ।

पान पान गळून गेले, ती विरक्ती सांगता,
बहरला चाफा तरीही, न्हायचे कोडे असे ।

गूढ ते माझ्याही करीता, हे फुलांचे डवरणे
तेच फांदीचे बहाणे, गायचे कोडे असे ।

तोच तो उपहास होई, हे विरागी वागणे,
का कधी आसक्त वृत्ती , भ्यायचे कोडे असे ।

सावरीता तोल जातो, पावले नादावली,
माफ ही करता स्वतःला, यायचे कोडे असे ।

आवरूनीया पसारा, तीर्थक्षेत्री चालले,
हाक येता थांबले ही, जायचे कोडे असे ।

(सौ.शैलजा शेवडे)

Comments

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?