कोप-यातली सतार, नादखुळी..नादखुळी...!

कधीच मैफिल संपली, धुंदीत तरी बावळी,
कोप-यातली सतार, नादखुळी, नादखुळी ।

कधी शब्द भावले, संगीतात गोवले,
सूर ताल ते नवे, तारांवर झंकारले,
शब्दावीण वादन कधी, तीही कथा संपली,
कोप-यातली सतार, मात्र अजून नादखुळी...!

तो तबला निपचिपसा, निवांत शांत बैसला,
तंबोरा तृप्त तृप्त, षडज गुप्त जाहला,
तरीही सुरावट उरी, घट्ट लेऊन बैसली,
कोप-यातली सतार, नादखुळी, नादखुळी...!

दादिडदा, दादिडदा, जप कसला चालला,
दिरदिरदिर, दिरदिरदिर जीव कुठे गुंतला,
कोवळी थरथर किती, अंतरात गुदमरली,
कोप-यातली सतार, नादखुळी, नादखुळी....!

(सौ.शैलजा शेवडे)

Comments

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?