सगुण रुपाचा तुझ्या गणपती,

सगुण रुपाचा तुझ्या गणपती असा लागला लळा,
येता जाता तुला बघावे, आनंदसोहळा ।

निराकार ब्रह्माने साजिरे, रूप गोड घेतले,
मातीचे गणराज होऊनी, घरो घरी आले।

देव पाहुणा, हर्षाने मग भक्त नाचू लागले,
चैतन्याने वातावरण हे सर्व भरून गेले ।

हसू लागल्या नाना विद्या, आणि सा-या कला,
सगुण रुपाचा तुझ्या गणपती असा लागला लळा,

वक्रतुंड, तू गजवदना, लंबोदर रे त्रिनयना,
किती आगळे रूप तुझे रे, तोषविणारे सर्वमना ।

किती किती अन पुन्हा पुन्हा तुज पाहू एकदंता,
आनंदाच्या लहरी केवळ तुझ्या कथा ऐकता,

भक्तीरसात डुंबून जाणे, आनंदच आगळा,
सगुण रुपाचा तुझ्या गणपती असा लागला लळा,

ही हुरहूर का अशी दाटली विसर्जनाच्या क्षणी,
वाजत गाजत निरोप जरी, तरी कल्लोळ हा मनी,

जनसागर हा मागे देवा एकच रे मागणे,
पुढ्च्या वर्षी लवकर येणे, ध्यानी हे ठेवणे,

मूर्तीवीण ही मखर मोकळी बघून दाटे गळा,
सगुण रुपाचा तुझ्या गणपती असा लागला लळा ।

( कवयित्री: सौ. शैलजा शेवडे)

Comments

Popular posts from this blog

मन गोकुळ हे

कसा आहे गं तो?